मोहोळ पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या श्री नागनाथ महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त भव्य मिरवणूक व आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यात्रेच्या निमित्ताने प्रमुख मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांनी यंदा समाधानकारक पाऊस पडेल, चारा मुबलक मिळेल आणि खरीप-रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात होईल, अशी भाकणूक केली.
मोहोळ पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामदैवत श्री नागनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त शनिवारी श्रींच्या पालखीची गणासह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ”ना चिंता, ना भय, नागनाथ महाराज की जय” या जयघोषाने चंद्रमौळी नगरी दुमदुमली होती. मोहोळ पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री नागनाथ देवस्थानच्या यात्रेत यात्रेचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या पालखीसह गणाची मिरवणूक रणरणत्या उन्हात निघाली होती. तत्पूर्वी श्री नागनाथ देवस्थानचे मुख्य मानकरी राजेंद्र खर्गे महाराज यांच्यात वायुरूपाने संचार होवून पालखीची गणासह सवाद्य मिरवणुकीत साकी व अभंगाच्या माध्यमातून शेख नसरू६ीन बादशहा की दो चिराऊ दिन ! हर बोला हर हर असा जयघोष करीत मिरवणूक सोहळा झाला. ईलियास भाई शेख मित्र परिवार व मुस्लिम समाज, आमदार राजू खरे मित्रपरिवार, लोकराज्य युवा मंडळ, हरिओम मित्रमंडळाच्यावतीने स्वर्गीय विजय सरवदे व सतीश क्षीरसागर यांच्या स्मरणार्थ संस्थेने शरबत, मठ्ठा व थंड पाण्याची सोय केली होती. सोहळ्यासाठी समस्त नागनाथ भक्तांनी परिश्रम घेतले.