राज्याच्या राजकारणात एकेकाळी खूप मोठा दबदबा असलेल्या अकलूजच्या मोहिते पाटील कुटुंबीयांनी आता वेगळाच निर्णय घेतला आहे. कधी भाजपपासून दूर.. तर कधी शरद पवारांच्या जवळ अशा भूमिका घेऊन त्यांनी अनेकांना चक्रावले. शरद पवारांबरोबर फारकत घेऊन अकलूज मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत त्यांनी भाजप प्रवेश केला होता. त्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची आमदार की बहाल करण्यात आली. मध्यंतरी मोहिते पाटील कुटुंब सायलेंट मोडवर होते. याचा फायदा घेऊन शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते पाटील यांना खासदारकीचे तिकीट देऊन जिल्ह्याचे राजकारण बदलले. अख्खे मोहिते पाटील कुटुंब भाजपचे विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर यांच्या पराभवासाठी मैदानात उतरले. त्यावेळी विद्यमान भाजपचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील अलिप्त होते. सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघातून भाजपला लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. शिवाय करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस हे मोहिते पाटलांचे प्रभाव असणाऱ्या मतदारसंघात देखील शरद पवारांचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे पराभूत झालेले खासदार रणजीत निंबाळकर पराभूत झालेले आमदार राम सातपुते यांनी कितीही आरडाओरडा केला तरी भाजपने आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे कोणतीच कारवाई केली नाही. मोहिते पाटलांची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या देखील लक्षात आली. आता पुन्हा मोहिते पाटलांनी आपली भूमिका बदलली असून आम्ही खासदारकीच्या वेळेस धैर्यशील मोहिते पाटील होतो मात्र आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपसोबत म्हणजेच आ.रणजीत दादा सोबत असणार असल्याचा गौप्य स्फोट जयसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत जयसिंह मोहिते पाटील यांनी ही भूमिका जाहीर केली आहे हे विशेष.

