भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या भाजपने अखेर मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवला आहे. शिवराजसिंह चौहान यांच्याऐवजी भाजपने नवा चेहरा मुख्यमंत्रिपदी दिला आहे. मोहन यादव आता मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील. मोहन यादव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात मोहन यादव यांनी काम केलं आहे. भाजपच्या विधीमंडळ गटनेता ठरवण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवराजसिंह चौहान यांनीच मोहन यादव यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाला भाजप आमदारांनी अनुमोदन दिल्याने, मोहन यादव हे मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री असतील यावर शिक्कामोर्तब झालं.