मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना मंत्रिपद देत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला शह देण्यासाठी मास्टरस्ट्रोक खेळला असल्याचं बोललं जात आहे.नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड या चौघांना संधी देण्यात येत आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना मंत्रिपद देत कोकण पट्ट्यातील शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले असल्याचे दिसत आहे.
नारायण राणे आणि कपिल पाटील यांना मंत्रिपद दिल्याने भाजपची कोकण किनारपट्टीवर ताकद वाढवण्याची योजना आखण्यात आली आहे.कोकणात एकूण 11 खासदार आणि 66 आमदार येतात. यात आगरी कार्ड राजकारण खेळायला भाजपने सुरवात केली आहे. शेकापचे शिक्षक आमदार बलराम पाटील यांच्या मागे कारवाईचा सिसेमेरा सुरू असून तिकडे शेकाप जयंत पाटील आर्थिक अडचणीत आहेत. नारायण राणे यांना मंत्रिपद देत सिंधुदुर्ग, रत्नागिरीत शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर कपिल पाटील यांना मंत्रिपद देत आगरी कार्ड खेळले जात आहे. रायगड, नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, भिवंडी-निझामपूर महानगरपालिका, कल्याण डोंबवली महापालिकेसाठी आवश्यक आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पनवेल कल्याण डोंबिवली या भागांत आगरी समाजाचे मतदान आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपचे आगरी कार्ड खूप महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वीच नवी मुंबई एअरपोर्टचा विषय घेऊन भाजपने हे काम सुरू केले आहे. वैचारीक विरोध असणारा शेकापला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे आता ठाण्यासह कोकणात मजबूत असलेला शिवसेनेच्या गडाला सुरूंग लावत या भागात आपले संपूर्ण वर्चस्व मिळवण्यास भाजपने सुरुवात केली आहे.