येस न्युज मराठी नेटवर्क : गुजरातमधील विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, निवडणूक जवळ आल्यामुळे येथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत काँग्रेस, आम आदमी पार्टी अर्थात आप पक्ष पूर्ण ताकद लावत आहे. तर दुसरीकडे एमआयएमदेखील येथे जवळपास ३० जागांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, एमआयएमचे सर्वोसर्वा असदुद्दीन ओवैसी यांना येथे काही ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. त्यांच्या सुरतमधील एका सभेत श्रोत्यांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार ओवैसी गुजरातमधील सुरत येथई रुद्रपुरा भागात एका सभेला संबोधित करण्यासाठी आले होते. मात्र येथे त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच ओवैसी यांच्या स्वागतावेळी सभेमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. ओवैसींच्या सभेमध्ये श्रोत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जयजयकार केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.