येस न्युज मराठी नेटवर्क : वर्ष 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला बहुमत मिळाले. आता 2024 मध्येही केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात सरकार येईल असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचे प्रयत्न 2019 मध्येही झाले. मात्र, लोकांनी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला. आताही 2024 मध्ये असेच होणार असून पंतप्रधान मोदी यांचा विजय होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. काँग्रेसशिवाय आघाडी तयार करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्याकडून सुरू आहे. शरद पवार यांची त्यांना साथ आहे. त्यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली असून विरोधी पक्षांमध्येच सध्या अंतर्गत सामना सुरू आहे. त्यांच्यातील सामना संपल्यानंतर आमच्याशी कोण लढेल हे पाहू अशी टिप्पणीही फडणवीस यांनी केली.