श्री सिद्धरामेश्वर मंदिर व्हावे सुवर्ण मंदिराप्रमाणे : मंत्र्यांनी दिली सकारात्मक उत्तरे
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील रखडलेले दोन्ही उड्डाण पूल, शहराचा प्रारूप विकास आराखडा, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाचे काम, हद्दवाढ भागातील गुंठेवारी खरेदी-विक्रीचा प्रश्न, पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे प्रलंबित असलेला ९८ कोटी रुपये निधीचा प्रस्ताव, १०० ई बससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर विकास, ६८ लिंग परिसर विकासासाठी निधी अशा शहर विकासाच्या महत्त्वाच्या प्रश्नांना आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी विधानसभेत वाचा फोडली. आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तरे देत लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
सोलापूर शहरासाठी २०१५ साली उड्डाणपूल मंजूर होऊन ९० टक्के भूसंपादन, निविदा प्रक्रिया झालेली असतानाही अद्याप दोन्ही उड्डाणपूलांचे काम सुरू झालेले नाही. ते कधी सुरू होणार ? असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला. सोलापूर शहराच्या हद्दवाढीनंतर ३३ वर्षानंतरही गुंठेवारी खरेदी-विक्री अद्याप बंद असल्यामुळे हद्दवाढ भागातील नागरिकांचा वनवास संपलेला नाही. तुकडा बंदीमुळे खरेदी-विक्री बंद करण्यात आली होती. अंतिम लेआउटचे कारण सांगून अनेक वर्षे लोकांना बांधकाम परवाना देण्यात येत नाहीत तसेच त्यांची खरेदी विक्रीही थांबवली आहे. यावर शासनाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली.
सोलापूर महानगरपालिकेकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रीन झोनला येलो बेल्ट करण्याची संधी असतानाही मनपा प्रशासनाने ते केलेले नाही. याउलट महानगरपालिकेनेच बांधकाम परवाने आणि वापर परवाने दिलेल्या खासगी जागांवर आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचे काम सोलापूर महानगरपालिका प्रशासन करत आहे. त्यामुळे हा आराखडा दुरुस्त करण्यासाठी नगर विकास विभागाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केली.
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणे विकसित होण्याची गरज आहे. तसेच श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या परिसराच्या विकासासाठी नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध होण्याची गरज आहे. यातून धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी १०० ई बस देण्यात येणार आहेत. मात्र या ई बससाठी लागणाऱ्या चार्जिंग स्टेशनचे कामच अद्याप सुरू झालेले नाही, याकडेही आमदार देवेंद्र कोठे यांनी लक्ष वेधले. शहरातील अंतर्गत जलवाहिन्या, जलकुंभ, नाले, ड्रेनेजची कामे यासाठी २०२२ साली महाराष्ट्र शासनाला ९८ कोटी रुपयांचा देण्यात आलेला प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे. तो निधी कधी उपलब्ध होणार ? असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी विचारला.
आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, अमृत २ योजनेसाठी ८९२ रुपयांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही त्रुटी काढल्या असून आगामी २ ते ३ दिवसात त्या त्रुटींची पूर्तता करून तो प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. आणि शासनाकडून या योजनेला लवकरात लवकर मंजुरी मिळेल, असे आश्वासनही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी सभागृहात दिले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल. त्याचबरोबर शहरातील स्ट्रॉमलाईनसाठी पहिल्या टप्प्यात १५३ कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात ९९.७५ कोटीचे काम करण्यात येणार असून त्याची निविदा काढण्यात आलेली आहे. हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल. शहरातील दोन्ही उड्डाणपुलासाठी भूसंपादन करण्याकरीता २९९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. उड्डाणपुलाच्या उभारणीकरिता शासनाकडून पुढील कार्यवाहीदेखील लवकरच होईल, असेही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.