मुंबई : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचं निधन झालं. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 87 वर्षांचे होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना सोमवारी (12 सप्टेंबर) उपचारांसाठी नाशिक (Nashik) येथील सुयश खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्यात शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे. रविवारी म्हणजेच उद्या सकाळी त्यांच्यावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नवापूर तालुक्यातील धुळीपाडा इथल्या एका गरीब आदिवासी सामान्य कुटुंबात माणिकराव गावित यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील होडल्या बोंडा गावित हे एक गरीब शेत मजूर होते. त्यामुळे माणिकराव गावित यांचं बालपण अतिशय खडतर आणि कष्टमय गेलं. सुरुवातीपासूनच नेतृत्वाचे गुण अंगी असल्यामुळे आणि आदिवासी समाजावर त्याकाळात होणाऱ्या अन्याय, अत्याचारामुळे पेटून उठलेला युवक म्हणून त्यांनी आपले राजकीय कार्य नवापूर गावात आणि परिसरात सुरु केली. परिणामी 1965 साली ते नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले. तिथूनच त्यांच्या राजकीय सामाजिक कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. जंगल कामगार सोसायट्यांमध्ये काम करणारा काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जाऊ लागले.