मुंबई : मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असं निरीक्षण पीएमएलए कोर्टाकडून नोंदवण्यात आलं आहे. महेश गुरवचा जामीन अर्ज फेटाळताना पीएमएलए कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं. शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये इन्वेस्ट केल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉण्ड्रिंग प्रकरणावरील सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं हसन मुश्रीफ यांचे पीए आणि निकटवर्तीय असणारे महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यापूर्वी पीएमएलए कोर्टानं हसन मुश्रीफ यांनाही अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला असून अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यापाठोपाठ आता मेहश गुरवही अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.