राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आपल्या संवेदनशीलतेचे व सुसंस्कृत वागणुकीचं उत्तम उदाहरण सोलापूरकरांसमोर ठेवलं. शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी एकीकडं कार्यकर्त्यांप्रती आपुलकी दाखवली. तर दुसरीकडं सध्या निर्माण झालेल्या पूरस्थितीची जाण ठेवत भव्य सत्काराला नम्रपणे नकार दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नजीब शेख यांनी मंत्री भरणे यांच्या स्वागतासाठी मोठ्या सत्काराचं आयोजन केलं होतं. यामध्ये क्रेनच्या साहाय्यानं त्यांना भला मोठा हार घालण्यात येणार होता. पण मंत्री भरणे यांनी, यंदा विशेषत सोलापुरात पुरामुळं झालेल्या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाल्यानं भव्य सत्काराला नम्रपणे नकार दिला. पण त्यांनी नजीब शेख यांच्याच हस्ते टोपी आणि शालचा सत्कार स्विकारत आपल्या नेत्याचा सन्मान राखला.

इतकचं काय तर मंत्री भरणे यांनी नजीब शेख यांचा उल्लेख भर पत्रकार परिषदेत केला. त्यांनी नजीब भाई, आपल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मी जरी क्रेनने हार घातला नाही, तरी आपला सत्कार मला पोहोचला आहे. मी आपल्या पाठीशी आहे, असं जाहीरपणे सांगितलं. एक नेता कसा कार्यकर्त्यांचा सन्मान राखतो आणि त्याचवेळी समाजातील परिस्थितीची जाणीव ठेवतो, याचं उत्तम उदाहरण आज सोलापुरकरांना पाहायला मिळालं.