मुंबई : आगामी लोकसभेसाठी दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आल्यानंतर ‘माजी’च राहण्याच्या शक्यतेनं नाराज झालेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांनी अखेर राजकीय देवारा बदलला आहे. काँग्रेसकडून माजी मंत्री राहिलेल्या देवरा यांनी 10 माजी नगरसेवकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. वर्षा निवासस्थानी देवरांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी शिंदे गटातील अनेक नेते देवरांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी देवरांसोबत 10 माजी नगरसेवकांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला. देवरा यांच्या पक्षप्रवेशाने शिंदे गटाला दिल्लीमध्ये चेहरा मिळाला आहे. त्यांच्या प्रवेशासाठी खासदार श्रीकांत शिंदे आग्रही होते, अशी माहिती आहे.
शिंदेंचा ‘हात’ पकडताच काँग्रेस आणि ठाकरे गटावर कडाडून हल्लाबोल!
पक्षप्रवेश केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटावर कडाडून हल्लाबोल केला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मी पक्षाच्या आव्हानात्मक काळात काँग्रेससोबत होतो. माझ्या वडिलांच्या काळातील काँग्रेस आणि आजची काँग्रेसमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. जर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी यांनी सकारात्मक, मेरिट आधारित राजकारण केलं असतं तर एकनाथ शिंदे आणि मला आज इथे येऊन बसावं लागलं नसतं. असा कार्यक्रम होत असताना कुणाला तरी नजर लावायची असते.