मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक बहुउद्देशीय ‘एमएच-६०आर’ प्रकारातील दोन हेलिकॉप्टर अमेरिकी नौदलाकडून देण्यात आली आहेत. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत वाढ झाली आहे. सेन्सरच्या साहाय्याने पाणबुड्यांचा शोध घेण्याची ताकद यामध्ये आहे.भारतीय नौदलाने अमेरिकेच्या नौदलाकडून सॅन दिएगो येथील नॉर्थ आयलंडवरील नौदलाच्या तळावर ही हेलिकॉप्टर्स समारंभपूर्वक स्वीकारली. अमेरिकेतील भारताचे राजदूत तरणजीतसिंग संधू यांनी ही हेलिकॉप्टर्स स्वीकारली. या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशन अमेरिकी कंपनीने केले आहे.
भारतीय नौदलाकडून एकूण २४ हेलिकॉप्टर्स आयात केली जाणार आहेत. ही हेलिकॉप्टर्स सर्व प्रकारच्या हवामानात विविध प्रकारच्या मोहिमांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहेत. अत्याधुनिक एवियॉनिक्स आणि सेन्सर्सचा वापर करून हेलिकॉप्टरची रचना करण्यात आली आहे. ती टॉरपीडोस आणि मिसाईल्स यांनी सुसज्ज असतील. ही हेलिकॉप्टर्स पाणबुडी आणि युद्धनौका यांना नष्ट करण्यात उपयोगी ठरणार आहेत. हेलिकॉप्टरवर बसविलेल्या सेन्सरच्या साहाय्याने पाण्याखालील पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यावर मिसाईल हल्ला करण्याची त्यांची क्षमता आहे. नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्यामध्ये विविध प्रकारची भारतीय शस्त्रास्त्रे आणि सामग्री बसविण्यात येईल. सध्या याचा वापर करण्याच्या दृष्टीने भारतीय कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे अमेरिकेत प्रशिक्षण सुरू आहे.भारत व अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारी सध्या नवी उंची गाठत असून दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार आता २० अब्ज डॉलर्सला पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांत हे सहकार्य वाढले आहे. संरक्षण व्यापाराशिवाय इतर क्षेत्रातही अमेरिका व भारत यांच्यात भागीदारी वाढत असून संधू यांनी सांगितले की, भारताने अलिकडे जी पावले उचलली आहेत, ती पाहता परदेशी गुंतवणूकदारांना यात नवीन संधी आहेत.