सोलापूर- सोलापूर शहरात करावयाच्या उड्डाणपूल(फ्लायओवर) व समांतर जलवाहिनी घालण्याच्या कामांमध्ये आलेल्या अडचणी सोडवणे संदर्भात आज प्रियदर्शनी महापौर निवास येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, महापालिका आयुक्त पि.शिवशंकर, शहराध्यक्ष विक्रम देशमुख तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील उड्डाणपूल(फ्लायओवर) व उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या सोलापूर शहरात दोन उड्डाणपूल(फ्लायओवर) प्रस्तावित असून या उड्डाणपूल(फ्लायओवर)मध्ये सायकल ट्रॅक व फुटपाथ सह उड्डाणपूल(फ्लायओवर)करण्याचे नियोजन होते. मात्र या भूसंपादनासाठी अडचणी निर्माण होत असल्याने उड्डाणपूल(फ्लायओवर) चे काम चालू करता आले नाही.त्याकरिता आजला फुटपाथ व सायकल ट्रॅक वगळून उड्डाणपूल(फ्लायओवर)चे काम चालू करण्यात यावे. तसेच स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम चालू आहे खाजगी शेतकऱ्यांच्या जागेतून ती पाईपलाईन प्रस्तावित होती. खाजगी शेतकऱ्यांच्या जागेतील पिक नुसकान भरपाईची रक्कम मोठ्या प्रमाणावर असल्याने व काही शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याने समांतर जलवाहिनीचे काम थांबलेले आहे परंतु शहराच्या दृष्टीने सदर समांतर जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याकरिता नॅशनल हायवेच्या R. O. W.च्या जागेतून सर्विस रोडच्या कडेने सदर समांतर जलवाहिनी टाकण्यात यावी.त्यानुसार नॅशनल हायवेनी जागा उपलब्ध करून द्यावी.