येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील काही जिल्हयातील कुक्कुट पक्षामध्ये बर्ड फ्लू ची लक्षणे आढळून आली आहेत. जिल्हयातील वनक्षेत्रात कावळे, पोपट, कोंबडी, बगळे या स्थलांतरीत होणारे पक्षी यांचे आकस्मिक मृत्युची घटना अथवा आजारी,संसर्गीत पक्षी निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या वनविभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. यासाठी विभागामार्फत नियुक्त केलेले समन्वयक अधिकारी यांनी तालुकास्तरीय पशुसंवर्धन अधिकारी यांचेशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करणेसाठी निर्देश देण्यात आलेत.
बर्ड फ्लू रोगाचा प्रार्दुभाव हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, व मध्यप्रदेश या राज्यातील पक्षांमध्ये आढळून आला आहे. तसेच महाराष्ट्रामध्येही काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. त्या संदर्भात विविध वृत्तपत्रे, दुरचित्रवाहिन्या, तसेच सोशल मिडियावरून बातम्या प्रसारित होत आहेत. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने उपाययोजना राबविल्या जात आहेत.
वनविभागामार्फत ज्या ठिकाणी पाणवठे किंवा जलाशय आहेत अशा जागा शोधून काढल्या आहेत. तसेच पाणवठयाजवळ वनविभागाच्या वतीने सर्वेक्षण करून त्याचा आढावा विभागामार्फत घेण्यात येत आहे. आपल्या परिसरात जलाशय किंवा पाणवठे असतील आणि या जलाशयात आजारी स्थलांतरित पक्षी असतील तर यासंबंधी त्यांनी वन विभाग किंवा पशुसंवर्धन विभागाशी तात्काळ संपर्क साधावा. असे आवाहन वन विभागाकडून करण्यात येत आहे.