लाकडाला सुपारीचा आकार,सुगंधी व गोड चवीसाठी केमिकल्स वापरत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस..
राज्यात अवैध गुटखा, सुगंधी तंबाखू , पान मसाला, खर्रा, मावा यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी आता कठोर पावले उचलली जाणार आहेत.
या अवैध व्यवसायातील मुख्य सूत्रधारांवर आणि गुटखा कंपनीच्या मालकांवर थेट मकोका अर्थात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत कारवाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला आहे.
गुटखा विक्रीचे रॅकेट परराज्यातूनही जोमात सुरू असून त्यात काही शासकीय अधिकारीही सामील असल्याचे उघड झाले आहे.
या रॅकेटमध्ये जे शासकीय अधिकारी सहभागी आहेत त्यांना अजिबात सोडणार नाही त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा झिरवाळ यांनी दिला.
मंत्रालयात दोन दिवसापूर्वी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अवैध गुटखा निर्मितीत मनुष्यांचे पार्थिव जाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाला सुपारीचा आकार देऊन त्याला रंग व केमिकल लावून सुगंधित केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव त्यांनी समोर आणले.हा केवळ अवैध व्यवसाय नाही तर तरुण पिढी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणारा गंभीर गुन्हा आहे, त्यामुळे यांना सोडणार नाही असा निर्धार झिरवाळ यांनी व्यक्त केला.

