भारतीय सैन्यात डेहराडून येथे कर्तव्य बजावत असताना भीषण अपघातात शहीद झालेल्या बाळासाहेब पांढरे या जवानाला मानवंदना देत शासकीय इतमामात शुक्रवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात साश्रु नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.शहीद बाळासाहेब यांचे बंधू आप्पासाहेब पांढरे यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
18 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता कर्तव्य बजावत असताना एका भीषण अपघातात या वीर जवानाने प्राण गमावले. त्यांचे पार्थिव मंगळवेढा येथे गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दामाजी चौकात आणण्यात आले.
माजी सैनिक आणि इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या पार्थिवावर फुले उधळत अमर रहे अमर रहेच्या घोषणा दिल्या.यावेळी सजवलेल्या वाहनांमध्ये वीर शहीद जवान पांढरे यांचा पार्थिव ठेवण्यात आला. संपूर्ण गाव बाळासाहेब पांढरे यांना पाहण्यासाठी वेशीवर थांबला होता. ग्रामपंचायत आणि बालाजी नगर माध्यमिक आश्रम शाळेत विद्यार्थ्यांनी 200 फुटाचा तिरंगा झेंडा घेऊन बाळासाहेब पांढरे अमर रहे च्या घोषणा दिल्या.त्यांच्या पार्थिवावर खासदार प्रणिती शिंदे, आमदार समाधान अवताडे यांनी पुष्पचक्र वाहिले. याप्रसंगी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, उपाध्यक्ष तानाजी खरात, माजी सभापती प्रदीप खांडेकर यांसह अन्य मान्यवर आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.

