सोलापूर – घरातील एसीचा स्फोट होऊन 40 वर्षीय विवाहितेचा बळी गेल्याची मन हेलावून टाकणारी घटना सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरात घडली. एसीमध्ये स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पल्लवी प्रवीण सग्गम असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या घरात बसल्या होत्या. त्यावेळी अचानक त्यांच्या घरातील एसीचा स्फोट झाला. स्फोटानंतर काही कळायच्या शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर संपूर्ण घराला आग लागली. ही आग एवढी भयंकर होती की, पल्लवी यांना घराबाहेरही पडता आले नाही.
घराला आग लागल्याचे लक्षात येताच शेजारच्या लोकांनी आरडाओरडा सुरू केला. त्यांनी पल्लवी यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती अग्निशमन दल व पोलिसांना दिली. अग्निशन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जवानांनी घराचा शोध घेतला असता पल्लवी यांचा अक्षरशः कोळसा झालेला मृतदेह त्यांना आढळला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना शॉर्टसर्किटमुळे घडली. एसीचा स्फोट हे ही यामागील एक कारण सांगितले जात आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.