पंढरपुरात ग्रंथतुलेने गहिरवरले खेडकर दाम्पंत्य: चाळीस शाळांना देणार सव्वातीनशे पुस्तके
पंढरपूर – आईवडीलांच्या सेवेत असलेल्या पुंडलिकांच्या भेटी पांडुरंग आले आणि त्याने टाकलेल्या विटेवर उभे राहून पंढरपूरवासी झाले. त्याच विट्ठलाच्या यात्रेतील गर्दीत आपले वृध्द आई-वडील सोडून जात असल्याच्या अनेक घटनांनी महाराष्ट्र दरवर्षी ढवळून निघतो. पण वर्क्तृत्व स्पर्धेतील राज्यभरातील मुलांनी पंढरपुरात येऊन आपल्या स्वर्गवासी मित्राच्या वडिलांची ग्रंथतुलेने सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व आईचा मातृगौरव सोहळा आयोजित करून अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला. या अनोख्या प्रेमसोहळ्याने पंढरपुरातील सूर्यकांत खेडकर व लता खेडकर हे दाम्पंत्य मात्र चांगलेच भाराहून गेले.
स्व. उमेशचंद्र खेडकर हे पंढपुरातील एका उमद्या वक्त्याचे नाव. सूर्यकांत आणि लता खेडकर या दाम्पत्यांचे तीन बहिणीनंतरचे चौथे अपत्य. महाविद्यालययीन जीवनात सहाशे हुन अधिक वक्तृत्व स्पर्धा जिंकलेल्या उमेशचंद्र यांचे दहा वर्षापूर्वी डेंग्युच्या आजाराने निधन झाले. मुलाच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरताना या दाम्पत्याने आपल्या सुनेचे आई-वडील होत तिचेही लग्न लावून सासरी पाठविले. तीन मुली लग्ने होऊन त्यांच्या त्यांच्या सासरी गेल्या. यानंतर हे खेडकर दाम्पत्य आपल्या लक्ष्मीनगरातील घरात एकटेच राहात आहे. महाविद्यालयीन जिवनात वर्क्तृत्व स्पर्धेत असताना त्यांनी शेकडो मित्र जोडलेल्या स्व. उमेशचंद्रच्या मित्रांनी त्यांना नेहमी भेटत राहून मानसिक आधार दिला. पण प्रेमाची प्रचिती आली ती एका अनोख्या सोहळ्याने.राज्यभरातील मित्रांनी एकत्र येत ऐक्याऐंशी वर्ष पूर्ण केलेल्या आपल्या स्वर्गवासी मित्राच्या वडिलांचा सहस्त्रचंद्र सोहळा नुकताच पंढपुरातील व्हेज ट्रीटच्या सभागृहात आयोजीत केला. तीनशे पन्नास ग्रंथजमवून सूर्यकांत खेडकर यांची ग्रंथतुला केली तर लता खेडकर यांना उमा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. मिलिंद परिचारक आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या हस्ते मातोश्री गौरव पुरस्कार देऊन गौरव केला.
या सोहळ्याचा संपूर्ण खर्च वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणार्या स्व. उमेशचंद्र खेडकर यांच्या मित्रांनीच केला. आपल्या भावाच्या मित्रांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याने अलका, उल्का आणि दिपा या खेडकर कन्याही भाराहून गेल्या. त्यांनी राज्यभरातून आलेल्या चाळीस भावांना ओवाळून आपली भाऊबीज साजरी केली.
या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांनी उमेश खेडकर यांच्या वर्क्तृत्वाच्या आठवणी सांगून त्यांच्या आई-वडिलांप्रती प्रेम व्यक्त केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उमेश खेडकर यांच्या आठवणी जाग्या करताना उमेश खेडकर या मित्राच्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उज़ाळा दिला. प्रारंभी शशिकांत कराळे यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले तर सोमनाथ गायकवाड यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य महेश खरात, प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे, माढा गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, सचिन लादे, राजेन्द्र शहा, पत्रकार दत्ता थोरे, सुेरश पवार गुरुजी, संजय मोरे, प्रा. डॉ. अर्चना चव्हाण, ऐड. अनंत देवकते, ख्यातनाम वक्त्या प्रीती शिंदे आदींनी विशेष परिश्रम केले.
ग्रंथतुलेतील ग्रंथातून चाळीस शाळांना वाचनपेटी: सुषमा अंधारे
सूर्यकांत खेडकर यांच्या ग्रंथतुलेतून चाळीस विविध वाचनपेटीचे संच बनविण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यातील चाळीस शाळांना देण्यात येणार आहेत. ‘ऑफ पिरियड’च्या वेळी ही वाचनपेटी त्या वर्गात नेवून वाचनासाठी दिली जाणार आहेत. यातील बहुतांश पुस्तके ही लहान मुलांना प्रेरणा देऊन उमेश खेडकर यांच्यासारखे वक्ते यातून घडतील असा विश्वास संयोजिका व शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.