मुंबई: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तमाम मराठी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मी मराठी, माझी मराठी’ हा बाणा जपू या!, असं आवाहन त्यांनी केलं. ‘एका ध्येयाने एक होऊन पुढं जाऊ या, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही ते पाहूच! पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारच,’ असा जबरदस्त विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करत मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा दिनाचा शुभेच्छा संदेश दिला आहे. ‘अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी भाषा हा अभिमान मिरविण्यासाठी ‘मी मराठी, माझी मराठी!’ असा बाणा जपायला हवा, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.