येस न्युज मराठी नेटवर्क : अनुष्का एका मध्यम वर्गीय कुटुंबात वाढली आहे. तिचे वडील अनिल बोर्डे यांचं औरंगाबादेत एक स्टेशनरीचं दुकान आहे, आई मनिषा बोर्डे या गृहिणी आहेत आणि मोठा भाऊ अभिनंदन बोर्डे हा बीएससी बायोटेक करतोय. घरची परिस्थिती तशी साधारण, पण तरी आई-वडिलांनी कधीही शिक्षणाबाबत कुठलीही कमतरती भासू दिली नाही, त्यांच्यामुळेच मी इथवर पोहोचले, असं अनुष्का सांगते. तर, ‘मी ज्यावेळेस घरच्यांना माझा हा निर्णय सांगितला, त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला आणि पुढच्या प्रवासातही फार मोलाची साथ दिली. त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. निकाल आल्यावर जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं की माझी निवड झालीये, तेव्हा आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, तर बाबांकडे काही शब्दच नव्हते.
आज जगात प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा ठसा उमटवत आहेत. यशाची उंच झेप घेत आहेत. यामध्ये आता आणखी एका महाराष्ट्रातील लेकीचं नाव जोडलं गेलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) शुक्रवारी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नौदल अकादमी परीक्षा (I) २०२२ चा निकाल जाहीर केला. यामध्ये कौतुकास्पद बाब म्हणजे पहिल्या तीनमध्ये दोन मुलींचा समावेश आहे आणि त्यात औरंगाबादेतील अनुष्का अनिल बोर्डे (वय १८) हिने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. पण, इथपर्यंत पोहोचणं अनुष्कासाठी काही सोपं नव्हतं. त्यासाठी तिला खूप मेहनत घ्यावी लागली. एका मध्यम वर्गीय कुटुंबातील या मुलीने जे करुन दाखवलं आहे, त्याने नक्कीच आजच्या तरुणाईला एक नवी दिशा मिळेल.