पुणे: मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडले कुठे ?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील शहर कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी हा सवाल केला.
खूप पूर्वी मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होतं. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे? मराठा तरुणांची निव्वळ डोकी भडकवायची आहे का?, असा सवाल राज यांनी केला.जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे. तेच ओबीसी आरक्षणाबाबत आहे. ओबीसींचं आरक्षणही सर्वांना मान्य आहे तर अडले कुठे? तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत? एकमेकांकडे बोट का दाखवत आहात? एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असे ते म्हणाले.निवडणुकीत हे नेते मतदान मागायला येतात. तेव्हा समाजाने या नेत्यांना जाब विचारावा. तुम्हाला आमचं आरक्षण मान्य आहे तर अडलं कुठं? असं त्यांना समाजाने विचारले पाहिजे. आमचा वापर तर केला जात नाही ना? याचाही समाजाने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.