येस न्युज नेटवर्क : मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. मनू आणि सरबज्योतनं शूटींगच्या १० मी एअर पिस्तुल मिश्र दुहेरी सामन्यात कांस्य पदक पटकावलं आहे. भारताच्या या नेमबाजांनी कोरियन जोडीला पराभूत केले आहे. याआधी रविवारी मनू भाकरनं महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुलमध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. त्यामुळे एकाच ऑलिम्पिकमध्ये २ पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदक जिंकवून देणाऱ्या मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करत आज दुसऱ्या ‘ब्राँझ मेडल’वर नाव कोरलं आहे. भारतीय जोडीनं साऊथ कोरियाच्या ली ओन्हो आणि ओह ए जिन या जोडीचा १६-१० या फरकाने पराभव केला आहे. हा क्षण भारतासाठी ऐतिहासिक आहे. शूटींगमध्ये याआधी कुठल्याही नेमबाजाने २ पदकं मिळवली नव्हती मात्र मनुने हा पराक्रम करून दाखवला आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये २ पदकं मनूने जिंकून भारताचं नाव जगात उंचावलं आहे. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदकं जिंकण्याची ‘न भुतो’ किमया मनू भाकरने करून दाखवली आहे