बीड – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. तत्पूर्वी मनोज जरांगे यांनी बीड येथील भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. तसेच बीडमध्ये मराठा समाजाच्या सभेत डीजे वाजवू दिला नाही, यावर प्रतिक्रिया देताना बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवा, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना शोधा
मनोज जरांगे म्हणाले, आपल्याला बीडच्या सभेत डीजे वाजवू दिला नाही, ठीक आहे. पण आमचा डीजे वाजवू दिला नाही, यापुढे बीडमध्ये कोणाचाही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. देवेंद्र फडणवीस यांनी जरा पोलिसांना आदेश दिले असतील आणि पोलिस जर चुकीचे काम करत असतील तर तसे करू नका. एवढी विनंती करूनही जर एखाद्या पोलिस अधिकाऱ्याला काही करायचे असेल तर त्या महादेव मुंडेंच्या मारेकऱ्यांना शोधा, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले.
मनोज जरांगेंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचे ते करा असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि शातंतेत मराठा आरक्षण घेणार, मराठा समाजावर आलेले संकट मोडून काढणार. सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिले, आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ? इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळतो.
बीडची गर्दी पाहून सत्ताधारी बेजार झालेत
मनोज जरांगे म्हणाले, गडबड घोटाळा करु नका. त्यामुळे मराठा समाजावर संकट घोंघावत आहे. ते संकट आता मोडून काढायचे आहे. तुमच्या आणि माझ्या भावनांचा सत्ताधाऱ्यांनी वापर करुन घेतला. मराठ्यांची ताकद मोठी आहे, पण आपण विचारांनी चाललो नाही. त्यामुळे आपल्या मुलांचे नुकसान झाले. प्रत्येकाने आपला वापर केला. उभ्या पिढ्यांचे वाटोळे झाले. यापुढे आपण विचारांनी चालायचे. बीडमधील मराठा समाज आता एक झाला आहे, गर्व वाटेल असे काम करतोय. आज बीडची गर्दी पाहून सत्ताधारी बेजार झालेत. आता असेच मुंबईला जायचे.
देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच 29 जाती या ओबीसी आरक्षणामध्ये घेतल्या, त्यांची मागणी नसतानाही त्यांना दिले. पण मराठ्यांची मागणी असतानाही मराठ्यांना आरक्षण दिले जात नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाही, ही पोटदुखी कशासाठी? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला.
फडणवीस मराठा-ओबीसी भांडण लावत आहेत
मनोज जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांचा डीएनए ओबीसी आहे, मग शेतकरी ओबीसी नाही का? त्यांना कर्जमाफी करा. देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत. आपण जातीयवादी नाही, त्यांनी तसा अपप्रचार केला. आता देवेंद्र फडणवीसांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण होणार नाही.
आता ही शेवटची लढाई
तुमच्या जातीचा आमदार, खासदार आहे म्हणून तुमच्या पोराबाळांची फी माफ होणार नाही, त्याला नोकरी मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने मुंबईला यावे. कुणा राजकीय नेत्याचे ऐकून गावात थांबू नका. तुमच्या आमदार, खासदारांना मुंबईला यायला सांगा. सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा. आता ही शेवटची लढाई असेल, असेही यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले.