परभणी : सरकारने आता भानावर यावं, असं म्हणत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. सरकारने आता तरी भानावर यावं. पहिल्यांदा एकदा आमचा कार्यक्रम करून बघितला. मात्र, आता नोटीसी देऊन जर काही करण्याचा प्रयत्न केला तर, तुम्हाला महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे यांनी परभणीच्या सेलू येथे आयोजित सभेत दिला आहे.
पोरांना नोटीसा का दिल्या जात आहेत
आम्ही मुंबईला जाणार नाहीत, तशी घोषणाही दिली नाही मात्र तरीही आमच्या पोरांना नोटीसा दिल्या जात आहेत, जर तुमची इच्छाच असेल तर आम्ही नक्कीच मुंबई बघायला येऊ असंही जरांगे म्हणाले आहेत. आम्ही कायद्याच्या मार्गाने आरक्षण मागत असू अन् तुम्ही नोटिसा देत असाल तर मग आम्ही काय करणार. एखाद्याची गाडी अडवली तर, सगळ्याच गाड्या तिकडे घेऊन जायच्या. मात्र पोलिसांना सहकार्य करा त्यांचा दोष नाही वरच्यांचा आहे, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे.
एकजूट फुटू देऊ नका
मी मराठ्यांसाठी अन् आरक्षणासाठी मरायला भीत नाही. मी 4 महिने झालं घराचा उंबरा शिवला नाही. माझी मायाबापाशी गद्दारी करणारी औलाद नाही. हा लढा जिंकायचा आहे. माझं कुटुंब हे मराठा समाज आहे, समाजासाठी मरायची ही तयारी ठेवली आहे. एकजूट फुटू देऊ नका राजकारण्यांचे ऐकू नका, असं म्हणत जरांगेंनी मराठा समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.