जालना: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा आंतरवाली सराटी गावात आज ठरवली जाणार होती. मात्र, याबाबतचा निर्णय आता म्हणून मनोज जरांगे यांनी पुढे ढकलला आहे. बीड जिल्ह्यात 23 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहे. त्यामुळे आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात असल्याचं देखील जरांगे म्हणाले आहे.
दरम्यान, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहे. 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाम असल्याचा निरोप देण्यात आला आहे. आपण काय आंदोलन करणार आहोत हे आजचं सांगितल्यास सरकारला कळून जाईल. आता मराठा समाजाला परत येऊ द्यायचं नाही. आता लढाई ताकदीने आणि युक्तीने देखील लढाईची. उद्या सरकारला त्यांची भूमिका जाहीर करू द्यावी, अन्यथा तुम्ही आधीच जाहीर करून टाकल्याचं ते म्हणतील. त्यामुळे बीड येथील 23 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
आता लक्ष बीडच्या सभेकडे…
मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकारला मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. मात्र, 24 डिसेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटी येथे बैठक बोलवण्यात आली होती. परंतु, आज ही घोषणा करण्यात आली नसून, बीड येथे होणाऱ्या 23 डिसेंबरच्या सभेत याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचा निर्णय मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मराठा आंदोलनाची पुढील दिशा काय असणार? याचा अंतिम निर्णय बीडच्या सभेतच होणार आहे. त्यामुळे आता या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.