येरमाळा : ‘देवी येडेश्वरी भक्त व धाराशिव सेवेकरी यांच्या पुढाकाराने येडेश्वरी मंदिरात गाभारा व मंदिर परिसरातील स्वच्छता मोहिमेने दिवसाची भक्तिमय सुरुवात झाली. पहाटे श्री आईसाहेब येडेश्वरी देवीची नित्योपचार पूजा, अभिषेक, पंचारती व महापूजा झाली. त्यानंतर खास केशर आंब्यांनी सजवलेला ‘आंबा आरास’ देवीसमोर साकारण्यात आली.
नैसर्गिकरीत्या पिकवलेला केशर आंबा वापरून येडेश्वरी देवीची आकर्षक आरास करण्यात आली. डोळ्यांचे पारणे फेडणारी ही आरास पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. महापूजेचे आयोजन भक्तिभावाने पार पडले. पूजेनंतर हा पवित्र आंबा – प्रसादरूपाने देवीचे पुजारी महेश बेदरे गुरव, त्यांचे गुरव सहकारी आणि सेवेकऱ्यांच्या हस्ते – भाविकांना वाटप करण्यात आला. – या भक्तिमय कार्यक्रमाला येडेश्वरी येरमाळा देवस्थान ट्रस्टचे उत्स्फूर्त सहकार्य लाभले.