मंगळवेढा तालुक्याचा दुसरा गावभेट दौरा
मंगळवेढा : ,09 मार्च 2024
सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील दुष्काळी गावे येड्राव, खवे, जित्ती , निंबोणी, भाळवणी, हिवरगाव, खुपसंगी, जुनोनी, गोणेवाडी, लक्ष्मीदहिडी, आंधळगाव, गणेशवाडी, शेलेवाडी, अकोला, कचरेवाडी, गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, काही दिवसापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, पदाधिकारी, नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नांविषयी निवेदन दिले. म्हणून मंगळवेढा तालुक्यातील पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडला. मंगळवेढ्याचा पाणी प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी या भागात आले असून पाण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.
एखादा प्रश्न उपस्थित करून गप्प न बसता तो प्रश्न चिकाटीने सोडवला पाहिजे या भूमिकेतून मी काम करत आहे मला राजकारणापेक्षा समाजकारणात व लोकांची कामे करण्यात अधिक रस आहे. त्यावर मी समाधानी आहे सध्याच्या खोके सरकारला लोकांच्या प्रश्नांची काही देणे घेणे राहिले नाही. ते आपल्या राजकारणात व्यस्त आहेत. माझ्याकडे कोणताही कारखाने अथवा संस्था नाही त्यामुळे ईडी वगैरे माझ्याकडे येण्याचा प्रश्न नाही. म्हणून सत्ताधारयांच्या विरोधात जोरात बोलते. आमदार खरेदी करण्यासाठी पन्नास पन्नास खोके देणारे सत्ताधारी मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी निधी देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. पण आता मी या प्रश्नात लक्ष घातले आहे. मंगळवेढा तालुक्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी ग्वाही दिली.
या दौऱ्यामध्ये शिवाजीराव काळुंगे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष राजेंद्र चेळेकर, सुरेश कोळेकर, पांडुरंग जावळे, अर्जुन पाटील, पांडुरंग माळी, मनोज माळी, युवक अध्यक्ष रविकरण कोळेकर, मनोज यलगुलवार, विनोद भोसले, दिलीप जाधव, शिवशंकर कवचाळे, मारुती वाकडे ,संदीप पवार, अजय अदाटे, बापू अवघडे, तिरुपती परकीपंडला, नाथा ऐवळे, पांडुरंग निराळे , संतोष क्षीरसागर, अमोल म्हमाने उपस्थित होते.