येस न्युज मराठी नेटवर्क : ब्रिटनसह जगातील काही देशात नव्या कोरोना विषाणूचा कहर निर्माण झाल्याने संपूर्ण जगभर खळबळ उडाली आहे. या नव्या कोरोना विषाणूवरची लस आली तरी सर्वांना संपूर्ण 2021 पर्यंत मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं सुरूच ठेवावं लागणार असल्याचं राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी स्पष्ट केलं.
ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती आढळून आली आहे. या जीवघेण्या कोरोनामुळे संपूर्ण जगभर खळबळ उडाली असून अनेक देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनसह अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजले जात आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. संजय ओक यांनीही अत्यंत महत्त्वाची माहिती देतानाच नागरिकांना सतर्क राहण्यासाठी काही सूचनाही केल्या आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूचा प्रारंभ हा लंडनमध्ये झालेला आहे. इंग्लंडमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या केसेस आपल्याला ऐकायला मिळत आहेत. म्हणजे संख्यात्मक विचार केला तर एका दिवसांमध्ये जवळजवळ 32 हजार नवे रुग्ण आढळून येत असून ही लक्षणीय बाब होती. कोरोनाचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरण्याचा जो संभव आहे, त्याची या उपप्रकारामध्ये 70% ॲक्टिव्हिटी अधिक आहे. त्यामुळे अधिक चिंता वाढली असून त्यासाठीच सर्वांनी खबरदारी घेण्याची गरज आहे, असं डॉ. ओक यांनी सांगितलं.