येस न्युज मराठी नेटवर्क : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. नंदीग्राम निवडणूक खटल्याची सुनावणी घेणारे न्यायमूर्ती कौशिक चंदा यांनी त्यांच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचे सांगत ममता यांना पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी न्यायमूर्ती कौशिक चंदा हे भाजपशी संबधित असल्याचे सांगत त्यांना काढून टाकण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती. न्यायाधीश कौशिक चंदा यांनी ही एक चाल असल्याचे म्हटले आहे. तसेच खटल्याची सुनावणी होण्यापूर्वीच माझ्या निर्णयावर परिणाम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांना ठोठावलेल्या दंडाची रक्कम करोना कालावधीत जीव गमावलेल्या वकिलांच्या कुटुंबाला मदत म्हणून देण्यात येणार आहे. नंदीग्राम प्रकरणाच्या सुनावणीत पक्षपातीपणाचा आरोप करत ममता यांच्या वकिलांनी न्यायाधीश कौशिक चंदा यांच्या खंडपीठाकडून हे प्रकरण हस्तांतरित करण्याची मागणी केली होती.