नवी दिल्ली – काँग्रेस पक्षात ५० टक्के आरक्षण हे ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी आरक्षित करण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे. आज त्यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी ते फार भावूक झाले होते. खर्गे म्हणाले की, “एका सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसचा अध्यक्ष केल्याबद्दल मी आभार मानतो. माझ्यासाठी हा भावूक क्षण आहे. सोनिया गांधी यांनी कष्टाने पक्षाला सांभाळलं आहे. मीसुद्धा पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करेन.”तसंच, त्यांनी यावेळी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. न्यू इंडियात रोजगार नाही. देशात महागाईने कळस गाठलाय. सरकार झोपले आहे.
ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून लोकांना टार्गेट केलं जात आहे. आजच्या राजकारणात खोट्याचा बोलबाला झाला आहे, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. मल्लिकार्जुन खर्गे यांनी पदभार स्वीकारताच सोनिया गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. त्या म्हणाल्या की, मी नव्या काँग्रेस अध्यक्षांचे अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते. सर्वात समाधानकारक बाब म्हणजे ज्यांना अध्यक्ष म्हणून निवडलं आहे ते एक अनुभवी आणि सर्वसामान्यांशी जोडलेले नेते आहेत. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कष्टाच्या आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर ही उंची गाठली आहे.