पंतप्रधान नरेंद मोदी यांचा पहिला पॉडकास्ट प्रदर्शित झाला आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील विविध क्षेत्रातील अनुभव सांगितले आहेत. पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, “मी सामान्य माणूस आहे, देव नाही, माझ्याकडूनही चुका होतात”. पंतप्रधान मोदी यांनी जेरोधाचे को-फाउंडर निखिल कामथ यांच्या यूट्यूब चॅनलसाठी दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, मोदींच्या या वक्तव्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. निवडणुकीच्या काळात मोदींनी म्हटलं होतं की, त्यांना ईश्वरानेच पाठवलं आहे. त्यानंतर आता या दोन्ही वक्तव्यांची चर्चा होऊ लागली आहे.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी स्पष्ट केलं की, त्यांच्याकडूनही चुका झाल्या आहेत, ते देखील एक सामान्य माणूस आहेत, देव नाहीत. पंतप्रधान असताना सरकार प्रमुख म्हणून निर्णय घेताना चुका होणे, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण यामागील हेतू चुकीचा नसावा. माणूस असल्याने त्यांनीही निर्णय घेताना चुका केल्या, पण त्यांचा हेतू कधीही वाईट नव्हता, असं मोदींनी म्हटलं आहे.