नवी दिल्ली : संपूर्ण देशाने 18 नोव्हेंबर रोजी अंतराळ क्षेत्रात एक नवा इतिहास रचताना पाहिला. या दिवशी भारताने खासगी क्षेत्राने डिझाइन आणि निर्मित केलेले ‘विक्रम-एस’ हे पहिले रॉकेट अंतराळात पाठवले. स्वदेशी अंतराळ स्टार्टअपच्या या पहिल्या रॉकेटने श्रीहरिकोटा येथून, ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयाचे मान अभिमानाने उंचावली. भारतातील खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय आहे. जी मुले कधीकाळी कागदाचे विमान बनवून उडवायची, त्यांना आता भारतातच विमाने बनविण्याची संधी मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’च्या 95व्या भागात भारताने अंतराळ संशोधनातील खासगी क्षेत्रातील सहभागाचा उल्लेख केला. ‘विक्रम-एस’ रॉकेट अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. इतर रॉकेटच्या तुलनेत ते वजनाने हलके आणि स्वस्त आहे. अंतराळ मोहिमांशी संबंधित इतर देशांच्यातुलनेत याचा विकास खर्च खूपच कमी आहे. कमी खर्चात जागतिक दर्जा देणे, ही आता, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची ओळख झाली आहे. या रॉकेटचे काही महत्त्वाचे भाग हे थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून बनवण्यात आले आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, ‘विक्रम-एस’च्या लाँच मिशनला दिलेले ‘प्रारंभ’ हे नाव अगदी योग्य आहे. भारतातील खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय आहे. अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले झाल्यानंतर तरुणांची ही स्वप्नेही प्रत्यक्षात उतरत आहेत.