अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या खरेदीचा मोठा गैरव्यवहार समोर आला आहे. राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटातच 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. राम मंदिरासाठीच्या भूखंडाचा हा घोटाळा बाहेर आल्याने देशभर एकच खळबळ उडाली असून ट्रस्टच्या विश्वासहार्यतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.
उत्तर प्रदेशात पुढच्यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचा हा घोटाळा उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जो भूखंड 2 कोटींचा आहे. तो अवघ्या दहा मिनिटात 18 कोटींचा करण्याची किमया ट्रस्टने साधल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केवळ दहा मिनिटात ट्रस्टने भूखंडाची किंमत कोट्यवधी कशी केली हा प्रश्न विचारला जात आहे. तसेच ट्रस्टने एवढ्या महागड्या भावात भूखंड का खरेदी केला? कशासाठी केला? हा व्यवहार कधी झाला आणि त्याला मंजुरी मिळाली तरी कशी? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
आपकडून घोटाळा उघड
आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी कागदपत्रांच्या हवाल्याने हा आरोप केला आहे. सिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. तसेच या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणीही केली आहे. केवळ आपच नव्हे तर माजी मंत्री पवन पांडेय यांनीही या घोटाळ्याचा आरोप केला आहे.