सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त व्याख्यान
सोलापूर, दि. 28- महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात स्त्री-पुरुष समानतेचे धोरण अंगीकारत जातिवाद नष्ट करत समताधिष्ठित समाजाची निर्मिती करून समाज सुधारण्याचे महान व क्रांतिकारी कार्य केल्याचे गौरवोद्गार कपिलधारा येथील डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामी यांनी काढले.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासनच्यावतीने महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी डॉ. वीरूपाक्ष शिवाचार्य महास्वामी हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा हे होते. प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून अध्यासनाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी अध्यासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व मान्यवरांचे स्वागत केले.
डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी वचन साहित्याच्या माध्यमातून ज्ञानाचा भांडार निर्माण केला आहे. या वचनांमधून आदर्श जीवनशैली, विचारशैली तसेच चांगले शिकवण सांगितले आहे. बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी अनुभवमंटपाची निर्मिती करून लोकशाहीची खरी मूल्ये रुजवण्यास सुरुवात केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा म्हणाले, महात्मा बसवेश्वरांनी समाज सुधारण्याचे महान कार्य केले आहे. अनेक वचन साहित्य त्यांनी रचले. बाराव्या शतकात लोकशाही संसद अर्थात अनुभव मंटपाची निर्मिती करून महान कार्य केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंबादास भासके यांनी केले.