येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. ४२ दिवसांनंतर महाराष्ट्रातील करोनाचे वाढलेले आकडे चिंता वाढवणारे आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत केरळमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. मात्र, केरळला मागे टाकत महाराष्ट्र कोरोना संसर्गाने सर्वाधिक प्रभावित राज्य ठरले आहे.सोमवारी महाराष्ट्रात ३ हजार ३६५ करोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली होती. तर, केरळमध्ये नवीन रुग्णांचा आकडा २ हजार ८८४ इतका होता. तसंच, संपूर्ण देशात गेल्या २४ तासांत करोनाचे नऊ हजार ०९३ रुग्ण सापडले होते. सोमवारी महाराष्ट्रात सापडलेले करोना रुग्णांचा हा आकडा ३० नोव्हेंबरनंतर सर्वाधिक आकडा असल्याचे म्हटले जात आहे.करोनाचे रुग्ण वाढत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. करोनाचे संकट पुरते संपले नसून, राज्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिक नियम पाळत नसल्यामुळ. परिस्थिती आटोक्यात येत नसल्यास कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते . राजेश टोपे यांनीही राज्यातील परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन कठोर निर्णय घेऊ, असे म्हटले होते . त्यामुळं राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावणार का?, अशी चर्चा होताना दिसत आहे.