मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ऋतुजा लटकेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री अनिल परब हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं सांगत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “आजच्या दिवसाची सुरुवात मी बाप्पांचे दर्शन घेऊन करत आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारीचा अर्ज भरायचा असल्याने आता मी बीएमसी कार्यालयात राजीमाना स्वीकारल्याचे पत्र घेणार आहे. मला अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत रेकॉर्डब्रेक विजय खेचून आणायचा आहे. त्यासाठी सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही. रमेश लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मालपाडोंगरीतील गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर मी देखील मालपाडोंगरी गणपतीचे दर्शन घेऊनच अर्ज दाखल करणार आहे” ऋतुजा लटकेंनी सांगितलं.