पहलगाम हल्ल्यात संपूर्ण देशभरातून २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये ६ महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश होता. या सहा जणांच्या कुटुंबियांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच, या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. जगदाळे कुटुंबातील मुलीला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलं.
“दहशतवादी हल्ल्यात आमचे बांधव मृत्यूमुख पडले त्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतलेला आहे. शिक्षणाची आणि नोकरीची गरज असल्याची मदत केली जाईल. सर्वप्रकारे दहशतवादचा विरोध आणि दहशतवादामुळे ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या परिवाराशी पाठीशी राज्य सरकार ठामपणे आहे, असा संदेश देण्याकरता असा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांना दिली.
दरम्यान, या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे हिला शासकीय नोकरी दिली जाणार असल्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे. आसावरीने माध्यमांसमोर याबाबतची माहिती दिली.
आसावरी म्हणाली, “राज्य सरकार पीडित कुटुंबांसाठी जे काही करतंय त्याबद्दल मी मुख्यमंत्री व इतर सर्व शासकीय लोकांचे मनापासून आभार मानते. त्या सर्वांनी आम्हाला सांगितलं आहे की ते आमच्याबरोबर आहेत. या कठीण काळात आमच्या कुटुंबांबरोबर आहेत. सरकारमधील प्रत्येकजण आम्हाला मदत करेल. राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू. आम्हाला आर्थिक मदत व मला शासकीय नोकरीचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्याबद्दल मी शासनाचे व मुख्यमंत्र्यांचे आभार मानते.”