सोलापूर : माढा, हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर आता शेकापने दावा केला आहे. यासाठी सांगोला येथे शेकापने भव्य मेळावा घेत शक्तिप्रदर्शन केले आहे. सांगोला तालुक्यासह माढा तालुक्यात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे माढासह हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापाला मिळावेत असा डाव भाई जयंत पाटील यांच्याकडून टाकला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ शरद पवारांनी रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी दाखवली असतानाच, जयंत पाटलांच्या दाव्याने नवीन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोमवारी सांगोलामध्ये आमदार जयंत पाटील, शेकाप नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकत्यांनी शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात आमदार पाटील यानी इंडिया आघाडीमधून माढा आणि हातकणंगले हे दोन मतदारसंघ शेकापला मिळावे यासाठी आग्रही मागणी केली. या मागणीमुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, रासपचे महादेव जानकर यांच्यानंतर आता नव्या पक्षाने दावा सांगितल्याने माढयाचा तिढा आणखी वाढणार आहे.