सोलापूर – लोकसेवेसाठी सामाजिक उपक्रम राबविता यावेत यासाठी सुरु केलेली चळवळ म्हणजे लोकमंगल फाऊंडेशन होय, सेवा कार्याच्या माध्यमातून लोकमंगल फाऊंडेशन समाजाच्या अनेक क्षेत्रात पोहोचले आहे. जसे की, अन्नपूर्णा योजने माध्यमातून गरजू, निराधार, वयोवृद्ध जेष्ठ नागरिकांना १५ लाखांपेक्षा जास्त डब्बे मोफत देण्यात आले आहेत. शैक्षणिक मदतीसाठी लोटस योजनेच्या माध्यमातून गुणवंत, गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन ८५ लाखापर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. यंदा १०० पेक्षा जास्त शाळामधून गरजू, एकल पालकांच्या विद्यार्थ्यांना १ लाख वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच धार्मिक, सांकृतिक प्रचार, प्रसिद्धीसाठी भजन- भारुड स्पर्धाचे आयोजन, भजनी मंडळांना साहित्य वाटप देखील करण्यात येते. या बरोबरच आरोग्य विषयक सेवा, दिव्यांगासाठी साहित्य, शेतकरी वृद्ध सेवा, जलसंधारण, समृद्धग्राम योजना, एकलपालक महिलांचे सक्षमीकरण, विविध शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील पुरस्कार, विद्यार्थ्यांसाठी किल्ला बांधणी स्पर्धा अशा अनेक योजनेच्या माध्यमातून मदत करत हा वटवृक्ष गरजवंतांना सावली देत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविणे हे आपले आद्य कर्तव्य मानून फाऊंडेशन काम करीत आहे.

सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून दरवर्षी होणारा लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०५ वाजून ०८ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर नेहरू नगर, विजयपूर रोड, सोलापूर येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. लोकमंगल फाऊंडेशन तर्फे विवाह सोहळ्याचे २० वे वर्ष असून ४६ वा सामुदायिक विवाह सोहळा आहे, अशी माहिती लोकमंगल फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.
विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल मल्टीस्टेट, आदी एकूण १०० पेक्षा पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणी सोमवार दि.१० नोव्हेंबर अंतिम तारीख असणार आहे. या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन लोकमंगल फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विकास नगर येथील लोकमंगल फाऊंडेशन ऑफीस येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७७२००९६४८८, ०२१७-२६०६०७०.
या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वरास बूट, वधूस चप्पल, मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहेत. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी ५ नग, स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. ५० हजार वन्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय केली असून वधू वरासोबत येणाऱ्या वन्हाडी मंडळी संख्येवर बंधन असणार नाहीत. वधू वरास वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी समुपदेशन देखील केले जाते. वधू-वरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूकही काढण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत, असे आमदार देशमुख म्हणाले.
आतापर्यंत ३१५३ जोडपी विवाहबद्ध
फाऊंडेशन तर्फे यंदाचा होणारा ४६ वा सामुदायिक विवाह सोहळा आहे. आतापर्यंत ३१५३ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यामध्ये हिंदू २४४३, बौद्ध ६७८, मुस्लिम २१, जैन ७ तर ख्रिश्चन समाजाचे ४ विवाह झाले आहेत.
जोडप्यांच्या मुलांनाही फाउंडेशनतर्फे मदत
लोकमंगल फाऊंडेशनच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांच्या मुलांनाही फाऊंडेशन तर्फे मदत केली जाते, त्यांना लोटस योजनेद्वारे शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची योजना फाऊंडेशन मार्फत राबवली जाते. याचा अनेकांनी लाभही घेतला आहे तसेच विवाह झालेल्या जोडप्यांना व्यवसायासाठी, रोजगारासाठी देखील मदत केली जाते.
लोकमंगल फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुठल्याही गावात ५ पेक्षा जास्त जोडप्यांचे लग्न जमले असल्यास त्याच गावात विवाह सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात येत असते. भविष्यात दिव्यांगासाठी देखील नोंदणी आल्यास वेगळा विवाह सोहळा भरवण्याचा मानस आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.