महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी दिली. विशेष म्हणजे या निवडणुकीत ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांनी यापूर्वी अनेकदा ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची जुळवणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आयोगाच्या व्हीव्हीपॅट न वापरण्याच्या निर्णयावर मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी नाशिक विभागातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यात दिवाळीनंतर टप्याटप्याने निवडणूक होणार असल्याची माहिती दिली.