राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित महायुती आघाडीचा (Mahayuti) फॉर्म्युला निश्चित झाला आहे. त्यानसुार महायुती फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी एकत्र युती करुन निवडणूक लढवले. मात्र, अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील. मात्र, या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील, अशी रणनीती महायुतीने आखली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढल्यास मविआला व अन्य विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो. महायुतीच्या तीन पक्षांमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा मविआच्या उमेदवारांना होऊ शकतो. हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढून नंतर पुन्हा एकत्र येतील.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना याबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी मुंबईत महायुती एकत्र लढेल, असे संकेत दिले. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असणारी मुंबई महानगरपालिका सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र आले आहेत. या दोघांचे आव्हान महायुती कशाप्रकारे परतवून लावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळेच महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. तर उर्वरित ठिकाणी रणनीती आखून एकत्र लढायचे की वेगवेगळे लढायेच हे आम्ही ठरवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

