येस न्युज मराठी नेटवर्क । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपण १२० नेत्यांची यादी ईडी आणि अर्थमंत्रालयाकडे सोपवणार असल्याची माहिती दिली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल बोलताना त्यांनी महाराष्ट्रात जे मुख्य लोक आहेत त्यांच्यावर दबाव आणून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आपल्याला अद्याप ईडीची कोणती नोटीस आली नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
“या सगळ्या चौकशा पूर्ण होऊद्यात नंतर १२० नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाकडे पाठवतो. या यादीत सत्ताधारी पक्षातील हे नेते आहेत. मग ईडी कोणाला नोटीस पाठवते हे पाहूयात,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. “मला अनेकांनी नोटीस आली का विचारलं. मी वाट पाहतोय आणि आली तरी आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवार किंवा अन्य कोणाला…नोटीस आली तर धक्का बसणार नाही. २० वर्ष जुनी थडगी उकरण्याचं काम सुरु असल्याचं मला कळलं आहे. आम्हीदेखील तयार आहोत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.