हैदराबाद/विजयवाडा : तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय रस्ते, रेल्वे मार्ग या वाहतुकीच्या साधनांचेही नुकसान झाले आहे. हजारो एकर शेतजमीन पाण्यात बुडाली असून बचाव आणि पुनर्वसन कार्यासाठी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत. दोन्ही तेलुगू भाषिक राज्यांना सोमवारी पावसाचा फटका बसला.
तेलंगणामध्ये १६ आणि आंध्र प्रदेशात १५ जणांचा पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्यू झाला. तेलंगणातील समुद्रमजवळ रेल्वे रुळाखालील खडीचा काही भाग पुराच्या पाण्यात वाहून गेला. आंध्र प्रदेशात जवळपास साडेचार लाख लोकांना याचा फटका बसला आहे. विजयवाडामध्ये दुधासह जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये एनटीआर, गुंटूर, कृष्णा, एलुरु, पलानाडू, बापटला आणि प्रकाशम यांचा समावेश आहे, असे एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच, मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफच्या २० टीम आणि एनडीआरएफच्या १९ टीम कार्यरत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि अनेक भागांत २४ तासांहून अधिक काळ वीज खंडित झाल्यामुळे विजयवाड्यात जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.
पुरामुळे इंटरनेट आणि मोबाईल टेलिफोन सेवा विस्कळीत झाली आहे. हैदराबादमधील कनेक्टिव्हिटीवर परिणाम झाला. विजयवाडा शहर आणि आसपासच्या भागात वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रकाशम बॅराजमधून ११.३ लाख क्युसेक पुराचे पाणी सोडण्यात आले.