राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली असून, त्यांच्यावर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणे आणि पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा गुन्हा नोंद होण्यामागे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेची पार्श्वभूमी आहे. दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या लॉबीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेतले होते. नितीन देशमुख यांच्या अटकेविरोधात रोहित पवार हे थेट पोलिस ठाण्यात गेले होते आणि तिथे त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी वाद घातला.
नेमके प्रकरण काय?
विधिमंडळात झालेल्या गोंधळ झाल्या नंतर आमदार रोहित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड हे पोलिस ठाण्यामध्ये आपल्या कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, तो कार्यकर्ता सदरील पोलिस ठाण्यामध्ये नसल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी रोहित पवार आणि पोलिसांमध्ये चांगली जुंपली होती.
शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल तर बोलायचे नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले. आवाज खाली, हातवारे करुन आमदारासोबत बोलायचे नाही, असा इशारा देखील रोहित पवार यांनी दिला होता. आमदार रोहित पवार यांचा पोलिसांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबरोबरच त्यांचे कार्यकर्ते देखील यावेळी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले होते.
सदर प्रकरणावर रोहित पवार काय म्हणाले?
आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनात गुंडानी हल्ला केल्यावर मकोकाचे आरोप असलेल्या गुंडांना अटक करायचे सोडून नितीन देशमुखलाच अटक केली. दोन महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर मारहाण झाल्याने त्यांची विचारपूस करण्याच्या अनुषंगाने नितीन देशमुख यांच्या भेटीची आम्ही मागणी केली असता, पोलिसांनी चार पाच वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला 3 ते 4 तास फेऱ्या मारायला लावत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच आव्हाड साहेबांना देखील हातवारे करत अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा रोहित पवारांनी केला. पोलिस प्रशासन कायद्याने कारवाई करणार असेल तर सहकार्यच राहते. परंतु, काही पोलिस राजकीय आदेशाने वागणार असतील तर काय? दाद कुणाकडे मागायची? राजकीय आदेशाने वागणारे पोलिस लोकप्रतिनिधींना देखील जुमानत नसतील तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील? असे रोहित पवार म्हणाले होते.