मुंबई : मोदी विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची फौज पाटण्यात दाखल होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षाचे प्रमुख नेतेही पाटण्यातल्या बैठकीत असणार आहेत. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे हे तीन प्रमुख नेते बैठकीला असणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची उपस्थिती असेल. 23 जून रोजी नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात बिहारमधल्या पाटण्यात विरोधकांची एकत्रित बैठक होणार आहे.
2024 मधील लोकसभा निवडणुकीच्याआधी विरोधकांच्या एकजुटीच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे. याआधी वेगवेगळ्या कारणांमुळे या बैठकीची तारीख दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर 23 जून रोजी म्हणजे परवा ही बैठक पाटण्यात होत आहे. विशेष म्हणजे मोदी विरोधकांच्या राष्ट्रीय पातळीवरील एकीमध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा होताना दिसत आहे. कारण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशिवाय त्यांच्या पक्षातील प्रमुख नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. एकप्रकारे महाराष्ट्रातील नेत्यांची फौजच विरोधकांच्या बैठकीसाठी पाटण्यामध्ये काम करताना दिसेल. या बैठकीला राष्ट्रीय पातळीवरील 15 ते 16 पक्षांची उपस्थिती या बैठकीला असेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी होणारी ही पहिली बैठक आहे. या पक्षांचा विरोध कसा आकार घेईल हे पार्श्वभूमीवर या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असेल.