सोलापूर : महाविकास आघाडीमध्ये राजकीय घटनांना वेग आला असून विधानसभा निवडणूकीपूर्वी सोलपुरात भाजप आणि अजितदादा गटातील दिग्गज नेते हातात तुतारी धरण्याच्या तयारीत आहेत.
माढा विधानसभेसाठी भाजपचे विधान परिषद आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने भाजपाला हा मोठा धक्का असू शकतो. यापूर्वी भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांचे बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटाकडून माढ्याचे खासदार झाले आहेत. माढ्याचे विद्यमान ज्येष्ठ आमदार बबन दादा शिंदे हे देखील अजित पवार गटाला रामराम करून पुन्हा शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. यासाठी आमदार शिंदे यांनी आपला मुलगा रणजीत सिंह शिंदे यांच्यासह अनेक वेळा शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यास आमदार शिंदे यांचे पुत्र रणजीत सिंह शिंदे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे हे आमदार असून आता या ठिकाणी माजी आमदार प्रशांत परिचारक हे निवडणूक लढवू इच्छितात यासाठी परिचारक हे शरद पवार यांच्या संपर्कात असून विधानसभेला तुतारी घेऊन निवडणूक लढवू शकतात . प्रशांत परिचारक हे पूर्वाश्रमीचे शरद पवार गटाचे असून पुन्हा ते स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. पंढरपूरच्या माजी नगराध्यक्षा साधना भोसले यादेखील परिचारक गटाच्या म्हणून ओळखल्या जातात त्यांनीही दोन दिवसापूर्वी जयंत पाटील यांची भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा साठी उमेदवारीची मागणी केली आहे.
याच पद्धतीने लोकसभा निवडणूक काळात विठ्ठल सहकारी साखर कारखाना अध्यक्ष अभिजीत पाटील हेदेखील विधानसभेला भाजपला सोडचिठ्ठी देत माढा किंवा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत अजित पवार राष्ट्रवादी सोडून गेल्यावर अभिजीत पाटील यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत शरद पवार यांना साथ दिली होती मात्र त्यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना भाजपकडे जावे लागले होते.
करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे अपक्ष असले तरी अजित पवार यांच्या गटाचे म्हणून ओळखले जातात या विधानसभेलाही संजय शिंदे हे महायुतीतून न लढता पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याने महायुतीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.
सांगोल्याचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे हेही या वेळेला शिवसेना आमदार शहाजी बापू यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे मात्र महायुतीची ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याने दीपक साळुंखे ही शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याच्या तयारीत आहेत .