जालना : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव उपोषण अखेर लक्ष्मण हाके यांनी अखेर संपवलं आहे. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही, तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे.
छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हाके यांना दिली. त्याचवेळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावं अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
बोगस सर्टिफिकेट देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं. त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावं. या सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. पंचायत राजच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षण देऊन घेणार की त्याशिवाय घेणार हे शासनाने स्पष्ट करावं. अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार असून त्यामध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल. या सरकारने आश्वासन दिलं आहे, पण केवळ त्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता ते फक्त तात्पुरतं स्थगित केलं आहे.