येस न्युज मराठी नेटवर्क : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा होत्या. त्यानंतर पक्षप्रवेशासाठी आजचा मुहूर्त ठरला होता, त्यानुसार पुणेकर यांचा पक्षप्रवेश झाला. “राष्ट्रवादीत प्रवेश करून मला आनंद झाला. माझं स्वप्न होतं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ते आज पूर्ण झालंय. दरेकरांनी जे म्हटलं ते ऐकून वाईट वाटलं. त्या वक्तव्याचा मी निषेध करते. त्यांनी तसं बोलायला नको होतं,” असं सुरेखा पुणेकर म्हणाल्या.
दरम्यान, पुणेकर यांच्या पक्षप्रवेशापूर्वी भाजपाचे प्रवीण दरेकर यांच्या एका वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिपण्णी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती. यासंदर्भात एबीपी माझासोबत बोलतांना सुरेखा पुणेकर म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकर फार चुकीचं बोलले. त्यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर अवहेलना तरी करु नका. त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना खूप त्रास होईल”