येस न्युज मराठी नेटवर्क : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील शहीद जवान प्रसाद कैलास क्षीरसागर यांच्यावर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. शहीद जवान, अमर रहे…या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. प्रसाद क्षीरसागर हे भारतीय सैन्य दलात सध्या अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत होते. ते 14 फेब्रुवारी, सोमवारी सकाळी सैन्यदलाच्या कॅम्पमधून सेवेच्या ठिकाणी जात होते. मात्र, ते आणि त्यांचे सहकारी ज्या ट्रकमध्ये बसले होते, तो ट्रक दरीत कोसळला. या घटनेत प्रसाद क्षीरसागर शहीद झाले. त्यांच्या मागे आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या एकट्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. विशेष म्हणजे ते गेल्याच महिन्यात सुट्टीवर आले होते. 30 जानेवारी रोजी सुट्टी संपवून ते पुन्हा अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्यावर रुजू झाले होते.