मिझोरम : देशातील ४ पैकी तीन राज्यात भाजपने सत्ता काबिज केल्यानंतर उर्वरीत मिझोरमच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी ८ वाजल्यापासून पोस्टल मतदानाचे निकाल समोर आले. त्यानंतर, आता ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दोन तासांतच येथील जनतेचा कौल समोर आला. राज्यात स्थानिक पक्षांचं वर्चस्व निकालात स्पष्ट होत असून झोराम पीपल्स मूव्हमेंटने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. झेडपीएमचे प्रमुख लालदुहोमा यांच्या पक्षाने २० जागांवर विजय मिळवला असून ७ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. म्हणजेच, त्यांनी ४० पैकी आवश्यक बहुमताचा आकडा गाठला असून लालदुहोमा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे.
मिझोरममध्ये काँग्रेसला अपेक्षित यश मिळाला नसून गतवर्षीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या जागा घटल्या आहेत. केवळ एका जागेवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे. तुलनेत भाजपचे २ उमेदवार निवडून आले आहेत. येथील सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. एमएनएफने केवळ ७ जागा जिंकल्या असून ३ जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे, येथे लालदुहोमा यांच्या झोराम पीपल्स मूव्हमेंटचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे.